बहुउपयोगी रानमेवा - जांभूळ

बहुउपयोगी रानमेवा -  जांभूळ 

 

 

जांभूळ हा मूलतः दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे बोराएवढी असतात. शास्त्रीय नाव सायझिजियम क्युमिनी(syzygium cumini) असे आहे. या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे (हिंदुस्थानचे) नाव नाव जम्बू द्वीप असे पडले. मूळ भारतीय असलेला हा वृक्ष म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, ते थेट ऑस्ट्रेलिया खंडातही सापडतो. समुद्र्सापाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतराजीवर ६००० हजार फुटांपर्यंत याचे वास्तव्य आढळते. माफक तापमान, उत्तम निचरा होणारी जमीन, ३०० इंचापर्यंत वार्षिक पर्जन्यमान या झाडास चालते. हा पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरतो. जांभळाचे फळ दीपक, पाचक व यकृतोत्तेजक आहे. अजनी, पिसा, हिरडा, आंबा या वृक्षांच्या जोडीला हा वृक्ष उगवतो. महाराष्ट्रात महाबळेश्वर, माथेरानभीमाशंकरवासोटाकोयना परिसर, सावंतवाडी  आंबोली परिसर या ठिकाणी उल्लेखिलेली अरण्ये आहेत. माकडे, वटवाघळे, फलाहारी पक्षी यांचा हा आवडता वृक्ष आहे

जांभूळ खाण्याचे फायदे

·        जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. तर किंचित प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. यामध्ये प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ व थोडय़ा प्रमाणात मेद असतो. त्याचबरोबर कोलीन व फोलिक आम्लही त्यामध्ये असते. कोवळ्या पानात ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे. जांभळाच्या बीयांमध्ये ‘ग्लुकोसाईड जांबोलिन’ हा ग्लुकोजचा प्रकार असल्यामुळे साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो. म्हणूनच जांभूळ व त्याचे बी मधुमेह या आजारावर अत्यंत गुणकारी आहे.

·        पोटदुखी, अपचन, अशुद्ध ढेकर येणे अशा विकारांवर जांभळाचे सरबत प्यावे. जांभूळ हे दीपक, पाचक असल्याने न पचलेले अन्न पचण्यास मदत होते.

·        दात व हिरडय़ा कमकुवत झाल्या असतील व त्यातून रक्त येत असेल तर जांभळाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्यात.

·        रक्तदाबाचा त्रास कमी होतो : मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब कमी होतो.

·        पोटांच्या विकारांवर उपयुक्त : पचन संस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरते. बियांचा अर्क जखम किंवा आतड्यातील अल्सर  इन्फेकशन दूर करण्यास फायदेशीर आहे.

·        जांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा, अनिमिया, यावरही होतो. तसेच जांभळाच्या ज्यूसच्या नियमित सेवनानं स्मरणशक्ती वाढते.

जांभळे ही नेहमी जेवण केल्यानंतरच खावीत. सहसा रिकाम्या पोटी जांभळे खाऊ नयेत. कारण जांभळे खाल्ल्यामुळे घसा व छाती भरल्यासारखी होते व अशा वेळी जेवण जात नाही. तसेच कच्ची जांभळे खाऊ नयेत.

 


Comments