बहुउपयोगी रानमेवा - करवंद

बहुउपयोगी रानमेवा -  करवंद



डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे.  सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. करवंद हा रानमेवा आरोग्यरक्षणासाठी सर्वानी आवर्जून खावा.

      करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.

     करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.

     करवंदांची फळे मृदू व गोटीसारखी असून पिकल्यावर जांभळट काळी होतात., चवीला आंबट-गोड असतात. फळात बहुधा चार बिया असतात.. पिकलेली फळे शीतकारक व भूक वाढविणारी असतात. मूळ कडू व कृमिनाशक आहे.. लाकूड कठीण व गुळगुळीत असते. त्यापासून चमचे, फण्या व इतर कातीव वस्तू तयार करतात.

 

करवंदाचे औषधी गुणधर्म-

* करवंदामध्ये मोठय़ा प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात.

* सूर्याच्या प्रखर उष्णतेने जर शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे.

* करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.

* अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.

* आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तसेच आंबट ढेकर येत असतील तर अशा अवस्थेत करवंदाचे सरबत थोडय़ा-थोडय़ा अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.

* करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.

• रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल,

• ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते, हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते.

• सूर्याच्या प्रखर उष्णतेने जर शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे.


करवंद लोणचे-

साहित्य : हिरवी करवंद २ वाटया, मोहरी डाळ पाऊण वाटी, मेथी २-३ चमचे, हिंग १ छोटा चमचा, हळद १ मोठा चमचा, तिखट अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे, तेल १ वाटी.

कृती : करवंद स्वच्छ धुऊन पुसून बिया काढून घ्या. मेथी, मोहरी डाळ थोडी भाजून त्याची पूड करून घ्या. त्यात तिखट मीठ घालून चांगले कालवून मसाल्यात घाला आणि कालवून घ्या. नंतर त्यात करवंद घालून कालवून बरणीत भरून ठेवा. तेल कमी वाटल्यास थोडे तेल गरम करून नंतर थंड करून त्यावर ओतून ठेवा.

 

करवंद सरबत-

साहित्य : दोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार.

कृती : करवंदांचा चीक जाण्यासाठी गरम पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवा. पाण्यातून काढून घ्या. दोन भाग करून बिया वेगळ्या करा. बिया वेगळा उर्वरीत करवंदाचा गर, साखर, मीठ आणि एक वाटी पाणी ज्युसर जारमधे एकत्र करा. मिक्सरला लावून नीट फिरवून घ्या. गाळणीने किंवा पातळ कापडाने गाळून घ्या. एक वाटी रसाला तीन वाट्या पाणी मिसळा. लागल्यास पाणी, साखर, मीठ वाढवा. सरबत तयार आहे


Comments